भारतातील ग्रामीण विधवांची सद्यस्थिती
Creators
Description
भारतीय समाजात स्त्रियांच्या प्रश्नांची सुरुवात त्यांच्या जन्मापासूनच होते. कारण आजही भारतीय समाजात मुलीचा जन्म ही फारशी आनंदाची गोष्ट मानली जात नाही. विवाहापूर्वी बालपण, शिक्षण आणि आरोग्य या सर्व बाबींच्या बाबतीत भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. तर स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या या दुय्यमत्वाच्या स्थितीत विवाहानंतरही फारसा बदल होत नाही. कुटुंब, विवाह, समाज, शिक्षण, कामाचे ठिकाण अशा सर्वच क्षेत्रात स्त्रियांना मिळणारी वागणूक पाहता त्यामध्ये भेदभाव, कनिष्ठता, दुय्यमत्व सर्वाधिक व सर्वत्र आढळून येते.
आधुनिक औद्योगिक समाज व्यवस्थेत एका बाजूला स्त्रियांची प्रगती दिसत असली तरी दुसऱ्या बाजूला स्त्रियांच्या हजारो समस्या आढळतात. प्रारंभीपासूनच भारतीय समाजात स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगळा आहे. त्याचा अनुभव आपण दैनंदिन जीवनात घेत आहोतच. आज स्त्रियांच्या परंपरागत दर्जेत व भूमिकेत अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत, त्यांना राज्यघटनेच्या माध्यमातून समान हक्क व अधिकार मिळाले आहेत, सर्व क्षेत्रात स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वीरित्या कार्य करत आहे. हे जरी खरे असले तरीही त्यांच्यावरील अन्याय आणि अत्याचार हे पूर्णपणे संपले असे कोणालाही म्हणता येणार नाही. कारण भारतीय समाज व्यवस्थेत पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना कायमच दुय्यमत्व प्रदान केल्याची वास्तविकता आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत असले तरीही भारतीय समाजात स्त्रियांना मिळणारा सन्मान व दर्जा निश्चितच गौरवशाली नाही. स्त्रियांचे कार्यक्षेत्र कुटुंब, चूल आणि मूल यापुरतेच मर्यादित असावे; हा भारतीय समाज व्यवस्थेतील परंपरागत दृष्टीकोन त्यांच्या या अवस्थेला कारणीभूत आहे. मग शहरी समाज असो, ग्रामीण समाज असो किंवा आदिवासी समाज असो. प्रत्येक समाजात आपल्याला स्त्रियांच्या समस्या आढळतात. भारतीय समाज व्यवस्थेत शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागांत स्त्रियांच्या समस्या अधिकच गंभीर स्वरूपाच्या आहेत. भूमिहीन मजूर, शेत मजूर, बलुतेदार, छोटे मोठे शेतकरी, जमीनदार यांच्या प्रत्येक कुटुंबात स्त्रियांच्या समस्यांचे स्वरूप अधिक गंभीर आहे. मग ती स्त्री विवाहित असो, अविवाहित असो, विधवा असो, वृद्ध असो, घटस्फोटीत असो किंवा परित्यक्ता असो. प्रत्येक स्त्रीला जीवन जगताना अनेक प्रकारच्या आव्हांना सामोरे जावे लागते. परंतु इतर स्त्रियांच्या तुलनेत ग्रामीण भारतात विधवा स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय आहे. कारण मुळातच भारतीय समाज व्यवस्थेत पुरुषाशिवाय स्त्रीचे संपूर्ण जीवनच व्यर्थ आहे किंवा पतीशिवाय त्या स्त्रीच्या जीवनाला कोणताही अर्थ नाही असे मानले जाते. त्यामुळे भारतीय समाजात विधवांना उपेक्षा आणि तिरस्काराचा सामना अधिक प्रमाणात करावा लागतो. विशेषतः ग्रामीण विधवांना नव्याने आयुष्य सुरू करण्याच्या संधी खूपच कमी प्रमाणात मिळतात. शासनाकडून विधवांना आर्थिक मदत देखील पुरेशा प्रमाणात मिळत नाही. अंधश्रद्धा, अज्ञान, शैक्षणिक मागासलेपणा, दारिद्र्य, वाढते वय, आजारपण, मानसिक आधाराचा अभाव, परावलंबन हे दृश्य तर ग्रामीण भारतात सातत्याने आढळते आहे. अशा तऱ्हेने भारतीय समाजात ग्रामीण विधवा स्त्रियांना सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक अशा अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
Files
30. Kiran Naiknaware.pdf
Files
(1.2 MB)
Name | Size | Download all |
---|---|---|
md5:2ad9f9c8a0e302de3bb1bb314ccf1c45
|
1.2 MB | Preview Download |