बी.एड. महाविद्यालयात शिक्षक प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी -शिक्षकांत भारतीय ज्ञान परंपरेबाबत असलेल्या जाणीव जागृतीचा अभ्यास
Description
भारतीय ज्ञान परंपरा ही विश्वाच्या सर्वात प्राचीन आणि समग्र ज्ञानप्रणाली आहे, जी वेद, उपनिषद आणि शास्त्रांद्वारे सतत प्रवाहित होत आली आहे. या परंपरेत जीवनाचे प्रत्येक पैलू – धर्म, विज्ञान, कला आणि नीतिशास्त्र – एकत्रितपणे समाविष्ट आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ने या वारशाचे संरक्षण आणि आधुनिक शिक्षणात समावेश करण्यावर भर दिला आहे, ज्यामुळे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल. भारतात आज अनेक कैक रूढी, चालीरीती परंपरागत चालत आलेल्या आहेत, त्या कुठेही लिहून ठेवलेल्या नसतात किंवा त्यांचे जतन केले जात नाही त्या ग्रंथित केलेल्या नसतात. आजही पारंपरिक ज्ञान काही भाग सूत्र रूपाने, सिद्धांत रूपाने ग्रंथित केला गेला आहे. त्या ग्रंथांमधून विविध शास्त्र, विज्ञान किंवा तत्त्वज्ञान सांगितले आहे. या ग्रंथबद्ध ज्ञानाला ‘भारतीय ज्ञान संस्था’ असे म्हटले जाते. ही ज्ञानपरंपरा अतिशय प्राचीन आहे. आणि तिचा ओघ अखंड वाहत आहे. अशा ज्ञान परंपरा इतरही प्राचीन संस्कृतींमध्ये होत्या. जसे इजिप्त, सुमेरियन, ग्रीक, बेबिलोनियन, पर्शियन इत्यादी. मात्र, त्या परंपरा काळाच्या ओघात व आक्रमणांच्या मार्यात नष्ट झाल्या. भारतीय ज्ञान परंपरा मात्र अनेक आघात सहन करूनसुद्धा आजही टिकून आहे. त्या अर्थी त्यामध्ये निश्चितपणे काही शाश्वत असे तत्त्व असणार. तसे नसते तर ते ज्ञान हजारो वर्षं टिकले नसते. ते ज्ञान टिकले तर आहेच, पण विशेष असे की, ते आजही वाचावेसे वाटते. त्या अर्थी ते नित्यनूतन आहे. प्रत्येक वाचनात त्यामधील काही नवीन अर्थ कळतो. या २१ व्या शतकात आपण सर्वजण हे सर्व शिकत आहोत आणि पुढील पिढीला त्याचा विसर पडता कामा नये म्हणून भारतीय ज्ञान परंपरेचे जतन आणि उत्तम संवर्धन करणे काळाची गरज आहे. सदर संशोधन लेखात भविष्यात शिक्षक म्हणून सेवेत येणाऱ्या विद्यार्थी-शिक्षकांत भारतीय ज्ञान परंपरा बाबत किती जाणीव आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.