मराठी कवितेतील मानवी मूल्य
Description
‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे’
‘माणूस’ हा समाजशील प्राणी आहे. तो आदिमानव काळापासून समूह करून राहत आला आहे. त्याकाळी पोटाचा प्रश्न हा त्याला महत्वाचा वाटे. शिकार करून तो आपले जीवन जगत असे. त्यासाठीच त्याचा संघर्ष होता. माणूस त्याकाळी एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असे. कालानुरूप त्या समूहाचे स्वरूप बदलत गेले. कालांतराने मानवाने विविध प्रकाराचे शोध लावले. दिवसेंदिवस तो विकसित होत गेला, आधुनिक होत गेला, प्रगत होत गेला. त्याची जीवनपद्धत बदलली. तो शतकानुशतके अधिकच गतिमान झाला. विज्ञानयुगात मानवाची अधिक प्रगती झाली. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले. तळागाळातल्या माणसाला शिक्षण मिळू लागले. शिक्षणाने माणूस डोळस झाला. त्याला स्वातंत्र्याचा अर्थ कळाला. असे असले तरी दिवसेंदिवस जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा, प्रदेश इत्यादी घटक अधिकच टोकदार झाले. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले, संघर्षाचे स्वरूप बदलले. माणसामाणसात दरी निर्माण झाली. मग शेकडो समस्यांनी जन्म घेतला. असे असले तरी आपल्या देशात त्या त्या शतकात महापुरुष जन्माला आलीत. त्यांनी आपापल्या परीने समता, मानवता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशाला अनेक थोर महापुरुषांची परंपरा आहे. त्यात तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर, म. फुले, म. गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, अशी अनेक नावे यानिमित्ताने घेता येतील, या सर्व महापुरुषांनी समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही समाजात विविध प्रवृत्ती जन्माला येतातच.