Published October 26, 2023 | Version v1
Journal article Open

ग्रामीण विकासाच्या संदर्भात महात्मा गांधी यांचे विचार

  • 1. विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी, ता. औसा जि. लातूर ४१३५१६ महाराष्ट्र, भारत

Description

भारत हा जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. भारत हा खेड्यांचा देश आहे व तो प्राचीन काळापासून खेड्यातच वसलेला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतात 70 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या आजही ग्रामीण भागात वास्तव्य करते; खेड्याकडे चला हा संदेश महात्मा गांधीजींनी लोकांना दिला भारत हा खेड्यात आहे असे म्हणणारे देखील महात्मा गांधीच होते. त्यांनी ग्रामीण विकासासंदर्भात आपले विचार लोकांना पटवून देण्याचे कार्य केले. ग्राम सक्षम बनले पाहिजे आणि स्वयंपूर्ण ग्राम हेच सक्षम व शक्तिशाली भारताचे भविष्य आहे म्हणूनच महात्मा गांधींनी ग्रामविकास व ग्रामस्वराज्याचे समर्थन करून त्यासाठी रचनात्मक चळवळ उभी करून ग्रामीण जीवनाचे चित्र पालटण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी मेरे सपनो का भारत या पुस्तकात म्हणतात की भारत हा सात लाख खेडे मिळून बनलेला देश आहे. भारत हा शहरांचा देश नाही तर तो खेड्यांचा देश आहे म्हणूनच ग्रामीण भागाचा विकास झाल्याशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही. म्हणजेच प्राचीन काळापासून खेड्यांना प्रशासनात व देशाच्या जडणघडणीत मुख्य स्थान होते म्हणून महात्मा गांधीजींनी देशांच्या सर्वांगीण विकासाकरिता ग्रामीण भागाचा विकास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 70 वर्षे होऊन ही गावांचा पूर्णपणे विकास झालेला नाही. अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती संस्कृती अविकसित असल्यामुळे गावांचा विकास खुंटला. गावातील सत्ता मोजक्या लोकांच्या हाती आल्याने योग्य व्यक्तींच्या सुप्त गुणांना वावमिळत नाही यासाठी खेडी आत्मनिर्भर स्वावलंबी होणे गरजेचे आहे. गांधीजी असे म्हणतात की खेड्यांची सुधारणा व खेडी विकसित करणे हे राष्ट्राचे पहिले कर्तव्य आहे. त्यांचे असे म्हणणे होते की गावात सुधारणा झाल्या पाहिजेत गावांचे आरोग्य सुदृढ असले पाहिजे व स्वावलंबी असले पाहिजे. म्हणजे संपूर्ण देश त्याच पद्धतीने उभा होईल. महात्मा गांधीजींचे जीवन म्हणजे एक तत्त्वज्ञानच होते या तत्त्वज्ञानावर नैतिकतेच्या आदर्शवादाचा पगडा होता. गांधीजी हे काळाच्या फार पुढे होते उद्योगधंद्यांचे एकाच ठिकाणी केंद्रीकरण न करता उद्योगांचे विकेंद्रीकरण त्यांना अपेक्षित होते. त्यासाठी त्यांनी ग्रामीण औद्योगीकरणाची संकल्पना मांडली. खेड्यातील लोकांना खेड्यातच रोजगाराची संधी निर्माण करून खेडी हेच विकासाचे केंद्र म्हणून पुढे आले पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती.

Files

20230105101104050_c.pdf

Files (213.8 kB)

Name Size Download all
md5:2da9d6d66576f08eebb5cf0cc986d86f
213.8 kB Preview Download