विविध फळझाडांसाठी जमीन, लागवड व खत व्यवस्थापना
Authors/Creators
- 1. Corresponding Author - Ph.D. Research Scholar, Department of Soil Science and Agricultural Chemistry, Post Graduate Institute, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Ahmednagar Maharashtra, India – 413722 - Email - aniketgaikwad1963@gmail.com Mob - 9156114952
- 2. Ph.D. Research Scholar, Department of Soil Science and Agricultural Chemistry, Post Graduate Institute, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Ahmednagar Maharashtra, India – 413722
Description
विविध फळझाडांच्या लागवडीचे यशापयश हे जमीन, हवामान, खत व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा यावर विशेष अवलंबून आहे. यापैकी खत व्यवस्थापनास अन्यन साधारण महत्व आहे. फळझाडांची लागवड केल्यानंतर नियमित आणि भरपूर उत्तम दर्जाची फळे येण्यासाठी जमीन सुपीक ठेवणे जरुरीचे आहे. फळझाडांची वाढ आणि त्यावर होणारी फलधारणा जमिनीतून मिळणाऱ्या पोषक अन्नद्रव्यावर आणि स्थानिक हवामानावर अवलंबून असते. त्यामुळे या दोन महत्वाच्या बाबींपैकी जमिनीच्या सुपिकतेकडे लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. जमिनीच्या सुपिकतेकडे दुर्लक्ष झाल्यास झाडांची वाढ कमी होते आणि झाडे किडी व रोगास बळी पडतात. झाडांची वाढ निकोप व्हावी म्हणून योग्य मशागत, तणांचा बंदोबस्त, खतांचा संतुलित पुरवठा, सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन म्हणून वापर, आच्छादनाची पिके, आंतरपिके इत्यादी मार्गांनी जमिनीची सुपिकता चागली ठेवणे फायदेशीर ठरते. फळझाडांच्या लागवडीसाठी योग्य आकाराचा खड्डा, (तक्ता क्र. २ मध्ये दिल्याप्रमाणे) योग्य अंतरावर एप्रिल-मे महिन्यातच खोदावेत. उन्हाळ्यात खड्डे तापू द्यावेत. खड्डा भरताना तळाला पालापाचोळा टाकून १५ ते २० किलो चांगले कुजलेले शेणखत व पोयटा माती व १ ते १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५०-१०० ग्रॅम फॉलीडॉल पावडर यांच्या मिश्रणाने जून च्या पहिल्या आठवड्यात भरून घ्यावा. दोन चांगले पाऊस पडून गेल्यावर सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यात रोपांची/कलमांची लागवड करावी. रोपे/कलमे खात्रीशीर रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत. सर्वसाधारणपणे फळझाडांना जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर व जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात वर्षातून तीन वेळा खते द्यावीत. परंतू खते देताना प्रत्येक फळझाडाचा बहार येण्याचा व फळे पक्व होण्याचा कालावधी लक्षात घेऊन खते द्यावीत. सर्वसाधारणपणे जून-जुलै महिन्यात संपूर्ण शेणखत अथवा कंपोस्ट खत, संपूर्ण स्फुरद व पालाश ची मात्रा द्यावी. नत्राची मात्रा एक ते दोन हप्त्यात विभागून द्यावी. खते देण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. खताची मात्रा देताना झाडाच्या मोठ्या विस्ताराखाली खोडापासून एक मीटर लांब, ४० ते ५० से.मी. रुंद आणि १५ से. मी. खोल वर्तुळाकार चर काढावा. प्रथम चरात पालापाचोळा आणि शेणखत नंतर रासायनिक खते सर्व बाजूनी टाकावी नंतर चर मातीने बुजवावा.