Published September 13, 2023 | Version v1

मराठवाडा मुक्ती संग्रामात महाराष्ट्र परिषदेची भूमिका

  • 1. राज्यशास्त्र विभाग, श्री कुमारस्वामी महाविद्यालय, औसा जि. लातूर ४१३५२० महाराष्ट्र, भारत

Description

मराठवाडा मुक्ती संग्रामात महाराष्ट्र परिषदेची भूमिका

प्रा. डॉ. डी. एस. पटवारी

विभागप्रमुख, राज्यशास्त्र विभाग, श्री कुमारस्वामी महाविद्यालय, औसा जि. लातूर ४१३५२० महाराष्ट्र, भारत

Corresponding author E-mail: dayapatwari@gmail.com

Received: 08 September, 2023 | Accepted: 10 September, 2023 | Published: 13 September, 2023

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रस्तावना

१९ व्या शतकातील निजामी राजवटीने २० व्या शतकातील असंतोषाची पायाभरणी केली होती. जनतेला सुखी ठेवून राजसत्ता करण्याची भूमिका जणू या परंपरच्या शासकांनी नाकारली होती. अन्याय व अत्याचाराची सर्वचैव होणारी व्याप्ती जनमनाला आंदोलित करीत होती. प्रत्येक शासकीय निर्णय व उचलले जाणारे पाऊल हे बहुसंख्य प्रजेला निराश व अस्थैर्य देणारे होते. ज्यातून १९ व्या शतकात इ.स. १८५७ नंतर पडलेली स्फुलिंगे आता आगीच्या निखा-याचे स्वरूप धारण करणार होती. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या संस्थानात घडणा-या उठावांनी व संस्थाना बाहेरून येणा-या व्यक्तींनी प्रेरक बीजांकुरे टाकली व निजामी राजवटीच्या भयंकर वागणुकीने त्याला फुंकर घातली व हे निखारे संघटना व आंदोलनाच्या स्वरुपात हळू हळू विकसित झाले.

अर्थात निजामी राजवट आणि जनता यातील दुरावा अनेक अंगानी प्रगट झाला. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक भूमिकेतून त्यांचे उद्रेक होऊ लागले. ज्यामुळे हैदराबाद संस्थाना राजसत्ता विरोधी गती प्राप्त झाली. यातून इ.स. १८९९ मध्ये चाफेकरांचे हैदराबाद मध्ये आगमन झाले होते. इ.स. १८९८-९९ मध्ये बीडच्या रावसाहेबांचा उठाव झाला. क्रांतिकारी कृत्यामुळे चाफेकर पकडले गेले. इंग्रज विरोधी बीडचा उठाव असला तरीही त्यांनी हैदराबाद सरकारच्या नोकरीतील किशनराव, दाजीसाहेब आणि शिवराव यांना आपल्या बाजूला वळविले आणि त्यांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रचारासाठी पाठविले. रावसाहेबांनी बीड, औरंगाबाद भागात पैसा उभारणी करुन लढा दिला. पण दि. १४ एप्रिल १८९९ रोजी व-हाडात आश्रय घ्यावा लागला. मराठवाडयाच्या स्वातंत्र्य संग्रामात रावसाहेबांच्या बीड आणि औरंगाबाद येथील बंडाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचे कार्य व प्रेरणा

हैदराबादच्या स्वातंत्र्य आंदोलनातील हुतात्म्याचा मान अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी मिळविला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील 'आईने मेटे' या खेडेगावी अनंत कान्हेरेंचे आई-वडील राहत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंदूर व निजामाबाद येथे झाले. इंग्रजी शिक्षणासाठी ते औरंगाबादला आपल्या मामाकडे राहिले होते. औरंगाबादच्या कलाशाखेचे ते विद्यार्थी होते. मामाची बदली झाल्यावरही शिक्षणासाठी ते औरंगाबादलाच रुपचंद मारवाडी यांच्याकडे राहत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नाशिकच्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारी संघटनेशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. त्यातून अनंत कान्हेरेंनी आपल्या मित्राच्या सहाय्याने औरंगाबाद येथे एका गुप्त मंडळाची स्थापना केली होती.

हैदराबाद राज्यात या गुप्त संघटनेचे धोगे दोरे किती दूरवर परसरले होते. हे हैदराबाद सरकारला कळून आले. या संघटनेच्या कामाची इत्यंभूत माहिती या ठिकाणी देणे अप्रस्तुत असले तरी या संघटनेच्या हैदराबाद मधील सभासदांची नावे पुढील प्रमाणे दत्तात्रय दिनकर अभ्यंकर, भास्कर आबाजी रसाळ, दामोदर नारायण जोशी, विठ्ठल गोपाळ, भगवान कृष्ण भुमकर, तुकाराम डाळवाला, दत्तोपंत, मोहन शेषेराव पोतदार, प्रभाकर भोगले, भीमराव सोनार, दत्तात्र्य गणेश भरसवाडकर, उमाजी शिंदे, दत्तात्रय गोविंद काळे, बळवंत सखाराम डिग्रॅ आणि वैजनाथ भोगले. या मंडळीची मजल पिस्तुले आणि काडतुसे बनविण्यापर्यंत गेली होती आणि जॅक्सनच्या खुनाची सूत्रे औरंगाबादहून हलविली गेली होती वगैरे गोष्टी खरोखरच आश्चर्यजनक आहेत. दत्तात्रय दिनकर जोशी यांनी या कटाबाबत केलेले निवेदन वाचल्यानंतर इंग्रज राजवटी विरुद्ध या मंडळीच्या मनात किती द्वेष वसत होता याची कल्पना येते. या कटाचे धागेदोरे साया हैदराबाद राज्यभर पसरले होते आणि कटाची उपडिक झाल्यावर या कटात भाग घेतलेल्या अनेक व्यक्तीना वेगवेगळया शिक्षा भोगाव्या लागल्या होत्या. क्रांतिकारकातर्फे नाशिकचा कलेक्टर ऑर्थर मॅसन टिपेल्स जॅक्सन यांच्या वधाचा निर्णय झाला व अनंत कान्हेरेने ती जबाबदारी स्वतःवर घेतली. दि. २१ डिसेंबर १९०९ मध्ये नाशिकच्या भद्रकालीन रस्त्यावरील विजयानंद नाटयगृहात रात्री ९ वाजता नाटक पाहण्यासाठी आलेल्या जॅक्सनला अनंत कान्हेरेंनी गोळ्या घालून ठार मारले. यात अनंत कान्हेरे व त्यांचे सहकारी पकडले गेले. त्यांच्या घराच्या झडत्या घेण्यात आल्या. शेवटी चौकशी पूर्ण होऊन खटला उभा राहिला. यात कान्हेरे व त्यांच्या मित्रांना शिक्षा झाल्या. अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे व विनायक नारायण जोशी यांना फाशीची शिक्षा झाली. शंकर रामचंद्र सोमण व नारायण जोशी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच गणेश बळवंत वैद्य व दत्तात्रय पांडुरंग जोशी यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा दिली. दि. १९ एप्रिल १९१० रोजी ठाण्याच्या कारागृहातल्या कैद्यांना फाशी देण्यात आली. स्वातंत्र्य युद्धाच्या महाकुंडात ज्यांनी आपल्या जीवनाच्या आहुत्या दिल्या त्यात ही कोवळया वयाची तरुण मुले ही होती. अनंत लक्ष्मण कान्हेरे या तरुण विद्यार्थ्याने केलेल्या धाडसी कार्याला हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात एव प्रेरक घटना म्हणून अत्यंत महत्वाने स्थान आहे.

 

 

महाराष्ट्र परिषदा आणि त्यांचे कार्य

हैदराबाद स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासात इ.स. १९३७ व इ.स. १९३८ ही वर्षे अत्यंत घडामोडीची मानली जातात. याच काळात राजकीय विचारांना स्थैर्य प्राप्त होऊन त्यांना एक विशिष्ट रुप प्राप्त झाले. ख-या अर्थाने राजकीय जीवनास आत्ताच आरंभ झाला असे म्हणण्यास हरकत नाही. बहुतेक लोकांनी विशीष्ट दिशेने विचार करायला आरंभ केला. सर्वांच्या मनात एकच विचार घोळू लागला. तो म्हणजे शक्य तितक्या शक्ती एकवटून लोकशाही स्वातंत्र्याकरिता लढा देणे होय. इ.स. १९३० साला नंतर संस्थानाबाहेरील राजकीय परिस्थितीत पडत असलेल्या बदलांचे राजकीय पडसाद संस्थानातही उमटू लागले. परंतु उघड उघडपणे राजकीय संघटना स्थापन करण्यास आणि जनसंघटन व चळवळी करण्यास बंदी असल्यामुळे राजकीय जागृतीचे कार्य प्रादेशिक परिषदांच्या माध्यमातून सुरु झाले. सर्व प्रथम १९३० साली आंध्र परिषदेची स्थापना झाली आणि त्यानंतर इ.स. १९३७ साली कर्नाटक आणि महाराष्ट्र परिषदा अस्तित्वात आल्या. हैदराबाद संस्थानातील राजकीय परिस्थितीत बदल होत असल्याचे हे निदर्शक होते. प्रादेशिक परिषदांच्या व्यासपीठावरून आपल्या समस्यांची चर्चा करण्याची संधी संस्थानातील प्रजेला मिळाली व हळू हळू त्यात राजकीय विषयांची चर्चा देखील होऊ लागली.

हैदराबाद संस्थानामध्ये राजकीय जागृतीच्या जडण-घडणीत महाराष्ट्र परिषदांनी उचललेला वाटा अतिशय मोठा होता. संस्थानास जबाबदार राज्य पद्धतीचा आग्रह धरताना एक व्यासपीठ या नात्याने या परिषदांनी एक दशकभर अतिशय मोलाचे कार्य केले. हैदराबाद संस्थानात महाराष्ट्र परिषदांनी फार मोठया प्रमाणात जागृती केली. त्यांची ठिकठिकाणी संस्थानात अधिवेशने झाली.

महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन (इ.स. १९३७)

महाराष्ट्र परिषदच पहिले अधिवेशन परतूर येथे दि. १ जून १९३७ ला झाले. या परिषदेचे अधिवेशन परभणी जिल्ह्यात परतूर येथे गोविंदराव नानल यांच्या अध्यक्षतेखाली भरले. या पहिल्या महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनात जमिनीचा पोत, मशागत, बियाणे इत्यादींची चर्चा करुन नानल यांनी शेतक-यांचे प्रश्न मांडले व सहकारी चळवळीचा पुरस्कार केला.

महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन (इ. स. १९३८)

दि. १ व २ जून १९३८ रोजी संघटित संघर्षाचे पुढील पाऊल म्हणून लातूर येथे भरले. या अधिवेशनाचे अध्यक्ष बॅ. श्रीनिवास शर्मा हे होते. तर स्वागताध्यक्ष भास्कररावजी वकील, नळदूर्ग हे होते. या महाराष्ट्र परिषदेच्या दुस-या अधिवेशनात परिषदेची कार्यकारिणी पुढील प्रमाणे निवडली गेली होती:

  1. बॅ. श्रीनिवास शर्मा (अध्यक्ष)
  2. श्री गोविंदराव नानल (उपाध्यक्ष)
  3. श्री गोविंद काशिनाथ नाईक (खजिनदार)
  4. स्वामी रामानंद तीर्थ ( सरचिटणीस)
  5. श्री विठ्ठल रंगनाथराव देशपांडे, हैदराबाद (सहचिटणीस)
  6. श्री लक्ष्मणराव गानू हैदराबाद, (सदस्य)
  7. श्री अंबादासराव बोरगावकर, हैदराबाद (सदस्य)
  8. श्री शंकरराव बोरगावकर, हैदराबाद(सदस्य)
  9. श्री वाय.डी. जोशी, हैदराबाद (सदस्य)
  10. श्री बी. जी. केसकर, हैदराबाद(सदस्य)
  11. श्री श्रीपतराव पळनिटकर, हैदराबाद (सदस्य)
  12. श्री दिगंबरराव बिंदू, हैदराबाद(सदस्य)
  13. श्री विनायकराव कोरटकर, हैदराबाद (सदस्य)
  14. श्री माणिकचंद पहाडे, औरंगाबाद(सदस्य)
  15. श्री डी. एस. पाठक, औरंगाबाद (सदस्य)
  16. श्री नारायणराव जोशी, अंबाजोगाई (सदस्य)

लातूर येथील महाराष्ट्र परिषदेच्या दुस-या अधिवेशनाबद्दलची माहिती अशा प्रकारची की, इ.स. १९३८ च्या जूनला उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर या गावी महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन भरले. आंध्र व कर्नाटक परिषदांच्या अधिवेशनाप्रमाणेच या अधिवेशनालाही एका अटीवर परवानगी मिळाली होती, ती अट म्हणजे अधिवेशनात राजकीयेत्तर विषय चर्चिले जावेत.,पण ही अट परिषदेच्या कार्यकत्यांना मान्य होणे शक्य नव्हते. राजकीयेत्तर विषयासाठी जमण्यात काहीच अर्थ नव्हता. तेव्हा मधला मार्ग काढण्यात आला. अधिवशेनाच्या अध्यक्षांचे भाषण व अधिवेशनात मांडल्या जाणा-या ठरावांची छाननी जिल्हाधिका-यांनी केल्यावरच अधिवेशनास सरकार परवानगी देण्यास तयार झाले. संघटकाच्या अगदी मताविरुद्ध ही अट मान्य करण्यात आली. आणि महाराष्ट्र परिषदेचे कार्यकार्ये लातूर या ठिकाणी अधिवेशनास आले. या अधिवेशनात खूप उत्साहाचे वातावरण होते. यापुढे मानभंगाची अवस्था सहन करावयाची नाही. या निर्धाराने लोक तेथे जमले होते. परंतु लातूरच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने उस्मानाबादच्या जिल्हाधिका-यांनी आपले ठाण मांडले होते. कडक बंदोबस्त अधिवेशन स्थळी होता. सभामंडपाच्या भोवताली व थोडया दूर अंतरावर पोलीस तैनात केलेले होते. या मागची भूमिका अशी की, भीतीने खेडयापाडयातील लोक परिषदेत जमा होऊ नयेत. तथापी सुशिक्षित समाज या अधिवेशनात ब-या पैकी उपस्थित होता. सभामंडपात दिगंबरराव बिंदू, काशिनाथराव वैद्य, बॅ. विनायकराव कोरटकर, वीर यशवंतराव जोशी, आ. कृ. वाघमारे, मुकुंदराव पेडगावकर, गोपाळशास्त्री देव, औरंगाबादचे ऑफ-वैशपायन गट व पहिल्यापासूनच अखिल भारतीय कला जाणारे व कांग्रेस कार्यकार्ये माणिकचंद पहाडे, बॅ. शर्मा आदी मंडळी उपस्थित होती. अधिवेशनाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी साहेबाकडे अध्यक्षाचे मुद्रित भाषण पाठविण्यात आले. त्याची स्क्रूटनी झाली. बराच मजकूर त्यांनी वगळला होता व तो वाचू नये अस्त आदेश दिला होता. अध्यक्षांच्या भाषणातील धूळपेठ दंगलीतील खून, जाळपोळ, लूटमार वगळावी असा आदेश होता. धूळपेठ प्रकरणाची चौकशी करावी असाही मजकूर भाषणात होता. नागरी हक्क प्रजेला मिळावेत व मुसलमान गुंडांच्या अत्याचारावर बंदी घालावी व त्यांच्यावर अमानुष अत्याचार केल्या बद्दल खटले भरावेत. आदी मागण्यांचा भाषणातील मजकूर वगळण्याचा व तो वाचण्याचा प्रयत्न अध्यक्षांनी करु नये असा आदेश जिल्हाधिकारी साहेबांचा होता व तो काटेकोरपणे पाळण्याचा आदेश दिला होता.

जिल्हाधिका-यांच्या आदेशामुळे नाईलाजाने आक्षेपार्ह भाग अध्यक्षाने वाचू नये असे ठरले.पण आणखी एक अडचण निर्माण झाली होती, ती म्हणजे अध्यक्षीय भाषण छापले गेले होते आणि लातूर येथे पुन्हा भाषण छापण्यासाठी मुद्रणालय नव्हते. तेव्हा जिल्हाधिका-यांनी परिषदेत अध्यक्षीय भाषणाच्या प्रती वाटण्यास मान्यता दिली. फक्त अध्यक्षांनी आक्षेपार्ह मजकूर वाचला नाही. आपले अध्यक्षीय भाषण करताना सर्वांना माहित असलेल्या काही कारणामुळे आपण भाषणातील काही भाग वाचत नाही असे सांगून अध्यक्षांनी त्या भागाचा निर्देश केला व तो भाग बाचला गेला नाही असे समजावे असे सांगितले गेले. श्रोते ते भाग वाचू शकले. फक्त अध्यक्षांच्या तोंडून ते ऐकू शकले नाही.” महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनात मांडल्या जाणा-या ठरावांच्या प्रती जेव्हा जिल्हाधिका-यांकडे पाठविण्यात आल्या त्यात जनतेला नागरी स्वातंत्र्या बाबतीत शिक्षण देण्यासाठी तीन सदस्यांची एक समिती नियुक्त करावी अशा आशयाचा एक ठराव होता. तसा तो निरुपद्रवी ठराव होता. पण जिल्हाधिका-यांना त्यात काही राजकीय छटा आहे असे वाटले आणि त्यांनी त्या ठरावाला परवानगी दिली नाही. दुस-या ठरावात धूळपेठच्या दंग्याची खुली चौकशी व्हावी अशी मागणी होती. या संबंधीचा अध्यक्षीय भाषणातील भाग जिल्हाधिका-यांनी वगळून टाकण्याचा आदेश दिला होता. विषयनियामक समितीस त्या संबंधीचा एक ठराव हवा होता. तेव्हा जिल्हाधिका-यांनी याही ठरावास विरोध केला. तेव्हा अधिवेशनाचे कामकाज थोडा वेळ स्थगित करण्यात आले. यातून काही मार्ग काढण्यासाठी काही जणांचे एक शिष्ठ मंडळ जिल्हाधिका-यांना भेटायला गेले. ब-याच चर्चे नंतर नागरी स्वातंत्र्याच्या ठरावास परवानगी देण्यास जिल्हाधिकारी अनुकूल बनले. महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनाला पुन्हा सुरुवात झाली. परंतु कोणताही वगळण्यात बरेच प्रतिनिधी तयार नव्हते. तेव्हा जिल्हाधिका-यांचा आदेश न जुमानता दोन्ही ठराव त्या क्षणीच पास करुन घ्यावेत असे त्यांना वाटले. एका मागून एक प्रतिनिधी बोलायला उभा राहू लागला व कायदेभंगाची तयारी दाखवू लागला. कित्येक लोक अटकेत जाण्यास तयार होते. अगदी शांत पृतीच्या लोकांना मात्र सबुरीचे धोरण स्वीकारावे असे वाटत होते. पण अधिवेशनाये कामकाज पुढे चालू देण्यास प्रतिनिधी तयार नव्हते. अपमानास्पद अशा अटी निमूटपणे मान्य करण्यापेक्षा अधिवेशन स्थगित कराणेच त्यांना अधिक मान्य होते. तर वैध वातावरणात वाढलेल्या वडीलधा-या मंडळींना अधिवेशन चालू द्यावे असे वाटत होते. पण त्यांना माघार घ्यावी लागली. पण अयोग्य अशा सरकारी हस्तक्षेपाच्या या नागरी स्वातंत्र्याच्या पायमल्लीच्या निषेधार्थ अधिवेशन बेमुदत स्थगित करण्यात आले.

 

 

लातूर येथे महिला परिषदेचे अधिवेशन

लातूर येथील महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने महिला परिषद दि. २ जून १९३८ रोजी भरली. महिला परिषदेच्या अध्यक्षस्थानी सी काशिबाई किर्लोस्कर होत्या. या परिषदेत प्रारंभी सक्रिय महिला कार्यकर्त्यां मुक्ताबाई नाईक या उपस्थित होत्या व त्यांचेही या परिषदेत भाषण झाले होते. मुक्ति लढयासाठी महिला परिषदेने एक स्वतंत्र व्यासपीठ उभे केले. या निमित्ताने समाजबांधणी व अनेक त्याज्य प्रथा आणि अंध विश्वास नष्ट करण्याचे ठरले. बालविवाह होऊ नयेत असा निर्णय झाला. अस्पृश्यतेचा प्रश्न हाताळला गेला. अस्पृश्यता पाळू नये असेही ठरले. पुढील चर्चेत आलेल्या प्रश्नात स्वी भर दिला गेला. शारीरिक शिक्षण मोफत व अनिवार्य, स्त्रियांसाठी प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य विषयक सोयी असाव्यात हे या परिषदेतील मुख्य विषय होते. या अर्थाने लातूरची महिला परिषद प्रेरणादायी होती. या परिसरातील ५०० स्त्रिया एकत्र येण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ होती. की, जेव्हा सामाजिक व शैक्षणिक बाबीवर विचार झाला. स्त्रिया धार्मिक उत्सवाच्या हेतूने एकत्र येतात मात्र धार्मिकेत्तर हेतूने त्या पहिल्या वेळेसच एकत्र आल्या होत्या. परिषदेच्या शेवटी 'वंदे मातरम्' हे राष्ट्र गान होऊन 'भारत माता की जय' च्या घोषणा झाल्या यातून स्त्रियांचा राजकीय कार्यातील प्रेरित सहभाग स्पष्ट झाला. या संघटित व्यासपीठातून सामाजिक सुधारणा चळवळ प्रभावी झाली. मुक्ति लढयात यामुळेच स्त्रिया प्रभावीपणे काम करु शकल्या. मुक्तिलढयात स्त्रियांच्या सहभागातून एक स्वतंत्र व निश्चित स्वरुपाचे योगदान लाभले. त्यामागे या अधिवेशनातून मिळालेली प्रेरणा होती.

महाराष्ट्र परिषदेचे तिसरे अधिवेशन १९४१

महाराष्ट्र परिषदेचे तिसरे अधिवेशन उमरी येथे दि. २९, ३०, ३१ मे १९४१ रोजी झाले. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून काशिनाथराव वैद्य हे होते. या परिषदेला ३०००-५००० च्या दरम्यान प्रतिनिधी उपस्थित होते. त्यापैकी प्रमुख म्हणजे श्री विनायराव श्री लक्ष्मीनिवास, गनेरीवाल, श्री गोविंदराव नानल, श्री माणिकचंद पहाडे, श्री लक्ष्मणराव गानू, श्री जनार्दनराव देसाई, श्री भिकाजी पाटील, श्री आर. नारायण रेड्डी, श्री सय्यद आलम, श्री सिराज-उल-हसन तिरमजी, श्री गोविंददास श्रॉफ आणि पंकुवार कोटेचा हजर होते. "या परिषदेत कुळांना संरक्षण देण्याचा स्वतंत्र ठराव झाला. तसेच सुधारणातील उणीवा मांडून जबाबदार राज्यपद्धती विषयी विचार झाला. तिन्ही भाषिक परिषदांना एकत्र करुन मंडळ प्रस्थापित करण्याची सूचना काशिनाथराव वैद्यांनी केली. भावी राजकीय सुधारणांची चर्चा करुन गांधींचा रचनात्मक कार्यक्रम स्वीकारण्यात आला.

महाराष्ट्र परिषदेचे चवथे अधिवेशन १९४३

महाराष्ट्र परिषदेचे चौथे अधिवेशन दि. १, २ व ३ जून १९४३ रोजी औरंगाबाद येथे झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष बॅ. श्रीधर बामन नाईक, स्वागताध्यक्ष आ. कृ. वाघमारे, तर चिटणीस गोविंदभाई श्रॉफ हे होते. औरंगाबाद येथे यावेळी महिला अधिवेशन ही झाले. त्याच्या अध्यक्षा पानकुंवर कोटेचा या होत्या. महाराष्ट्र परिषदेच्या या अधिवेशनात तुरुंगातून सुटून आलेल्या नेत्यांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. या परिषदेतील बॅ. श्रीधर नाईक यांचे अध्यक्षीय भाषण शेतक-यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे होते. धान्य व कापड स्वत बराने विकावे, स्वत धान्यांची दुकाने काढावीत अशी त्यांनी सूचना केली होती. औरंगाबाद पासून ठराव व्यापक होत गेले. शेती व शेतक-यांचे प्रश्न विस्ताराने मांडण्यात येऊ लागले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यावर ठराव करण्यात आले.

महाराष्ट्र परिषदेचे पाचवे अधिवेशन १९४५

महाराष्ट्र परिषदेचे पाचवे अधिवेशन सेलू येथे दि. २४, २५ में १९४५ रोजी झाले. हे पाचवे अधिवेशन बीडला होणार होते. पण परवानगी न मिळाल्यामुळे सेलू या ठिकाणी ठरले. या परिषदेचे अध्यक्ष दिगंबरराव बिंदू हे होते. या परिषदेतील त्यांचे भाषण विचार प्रवर्तक होते. तळागाळातील लोकनेत्यांचा उदय या काळात झाला. आता परिषदेचे नेतृत्त्व सामान्य प्रजेतून पुढे असलेल्या लोक नेत्याकडे येत होते. सेलू परिषदेने याची सुरुवात केली असे म्हणावे लागेल. याच वेळी झालेल्या महिला परिषदेचे अध्यक्षस्थान सुशीलाबाई दिवाण यांच्याकडे होते. महिला वर्गातील अपूर्व जागृती हे या लढयाचे वैशिष्ठय होते.

महाराष्ट्र परिषदेचे सहावे अधिवेशन १९४६

महाराष्ट्र परिषदेचे सहावे अधिवेशन लातूर येथे दि. १५, १६ मे १९४६ ला झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आ. कृ. वाघमारे हे होते. या अधिवेशनावर जहालांनी प्रभाव टाकलेला दिसतो. लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र परिषदेच्या सहाव्या अधिवेशनाने निवडलेले कार्यकारी मंडळ खालील प्रमाणे होते:

  1. श्री आ. कृ. वाघमारे, औरंगाबाद (अध्यक्ष)
  2. श्री स. कृ. वैशंपायन, हैदराबाद (चिटणीस)
  3. श्री जीवनराव बोधनकर, नांदेड (कोषाध्यक्ष)
  4. श्री काशिनाथराव वैद्य, नांदेड (सभासद)
  5. श्री दिगंबरराव बिंदू, नांदेड (सभासद)
  6. श्री मुकुंबराव पेडगावकर, परभणी (सभासद)
  7. श्री श्रीनिवास बोरीकर, परभणी (सभासद)
  8. श्री. अनंतराव भालेराव (सभासद)
  9. श्री गोविंददास श्रॉफ, औरंगाबाद (सभासद)
  10. श्री चंद्रगुप्त चौधरी, औरंगाबाद (सभासद)
  11. श्री माणिकचंद पहाडे, औरंगाबाद(सभासद)
  12. श्री रतनलाल कोटेचा, बीड (सभासद)
  13. श्री पुरुषोत्तम चपळगावकर, बीड (सभासद)
  14. श्री विश्वभरराव हराळकर, उस्मानाबाद (सभासद)
  15. श्री व्यं. बा. जोशी, उस्मानाबाद (सभासद)
  16. श्री बाबासाहेब परांजपे, उस्मानाबाद (सभासद)

या अधिवेशनात आ. कृ. वाघमारेंनी भाषिक पुर्नसंघटना विषयीची ऐतिहासिक गरज मांडली. तसेच महाराष्ट्रात मराठवाडयाच्या विलीनीकरणा विषयी विचार मांडले आणि त्याची काही कारणेही त्यांनी मांडली. परकीय सत्तेने स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीच्या व नैसर्गिक आधारावर मांडणी करुन आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्राचे तुकडे मिळून वर्तमान संस्थान अस्तित्त्वास दिसते आणि यातून सरकारने एकीचे विभाजन केलेले दिसले.

महाराष्ट्र परिषदेच्या लातूर अधिवेशनात जबाबदार राज्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा, शोषणरहित अर्थव्यवस्था निर्माण करण्यात यावी, लोकशाही, समाजवादी समाजरचना प्रस्थापित व्हावी, नागरी स्वातंत्र्य प्रदान करण्यात यावे, कर्नाटक आंध्र व महाराष्ट्र या तिन्ही परिषदांचे एकत्रीकरण व्हावे, किसान, मजूर, महिला, युवक आदी सर्वच क्षेत्रात भरीव संघटनात्मक कार्य व्हावे, कुळांना पूर्ण संरक्षण मिळावे व त्यांना संरक्षण देणारे कायदे निर्माण करण्यात यावेत. विणकरांना त्यांच्या मासिक गरजेच्या एक तृतीयांश सुत पुरविले जावे, रंगीत व हिरवे सुत पुरविले जावे, शिंपी लोकांना शिवणकाम करण्यासाठीचा दोरा नियंत्रीत दराने द्यावा अशा स्वरूपाचे ठराव संमत करण्यात आले. लातूरच्या मुख्य अधिवेशनाला जोडून किसान व शेतक-यांचे स्वतंत्र मेळावे झाले. किसानांच्या मेळाव्यात श्री आ. कृ. वाघमारे, श्री शंभुगीर महाराज, श्री व्यंकटराव जाधव व श्री खुशालराव मोताळे यांची भाषणे झाली. या मेळाव्याचे अध्यक्ष हैदराबादचे विद्यार्थी नेते श्री के.व्ही. नरसिंगराव होते. विद्यार्थ्यांच्या मेळाव्या समोर स.कृ. वैशंपायन, रामचंद्र नांदापूरकर यांची भाषणे झाली. या परिषदेला पं. जवाहरलाल नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांचे संदेश आले. लातूर येथील महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनात भाई उद्धवराव पाटील यांचा फार मोठा सहभाग होता. उद्धवराव पाटलांनी शेतक-यांची संघटना बांधून शेतक-यांच्या प्रश्नावर रान पेटविले होते.

महाराष्ट्र परिषदेच्या सहाही अधिवेशनातून अनेक समस्यांची चर्चा करण्यात आली. १९३७-४६ या काळात तिला शैशव, बाल्य व तारुण्य या तिन्ही अवस्थातून जावे लागले. महाराष्ट्र परिषदेच्या कार्याचा वेग राष्ट्रीय विचाराकडे घेऊन जाणारा होता. बहुतेक अध्यक्षांनी शेती व शेतक-यांचे प्रश्न जिव्हाळयाने मांडले. त्याच बरोबर सारा व सावकारशाहीचे प्रश्न ही मांडण्यात आले. खादी ग्रामो उद्योग व स्वदेशीचा पुरस्कारही करण्यात आली. बहुजन समाजाच्या कल्याणाचा आग्रह महाराष्ट्र परिषदेने धरला होता. जहाल नेत्यांनी निजामाच्या सुधारणास थोतांड म्हणले होते. शिक्षण प्रसार, अस्पृश्यता निवारण, प्रौढ शिक्षण, मंदिर प्रवेश, खादी व ग्रामोद्योग इत्यादीवर भर देण्यात आला. त्याच बरोबर नागरी स्वातंत्र्याची गरज, राजकीय सुधारणा, भाषिक परिषदांचे ऐक्य परिषदेची घटना, विणकर प्रश्न, राजकीय परिस्थिती, अन्न प्रश्न, शेती व शेतकरी, शिक्षण व जबाबदार पद्धती या प्रश्नांना महाराष्ट्र परिषदेने व्यापक दिशा दिली होती.

आर्य समाजाची स्थापना, विस्तार व कार्य

हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाची पायाभरणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आर्य समाजाने केले होते. दयानंद सरस्वतींनी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना चैत्र शुक्ल प्रतिपदा संवत १९३२ विक्रमी, 'तदनुसार दि. ६ एप्रिल १८७५ बुधवार या दिवशी संपन्न झाली. आर्य समाजाची सर्वप्रथम स्थापना करणा-या दयानंद सरस्वती यांची मातृभाषा गुजराती पण त्यांनी हिंदी भाषेचा अभ्यास केला व आर्य समाजाच्या कार्याचा भारतभर विस्तार केला. हिंदू समाजाच्या दौर्बल्याबद्दल दयानंद सरस्वती फार अस्वस्थ असत. हिंदूची हीनदीन अवस्था पाहून त्यांचे मन बेचैन होत असे. सत्याचा प्रभावी प्रकाश देणारे वैदिक तत्वज्ञान आचरणात आणल्या शिवाय या देशाला तरणोपाय नाही. या विचाराने त्यांनी आपल्या कार्याचा आरंभ केला. आर्य समाजाचे अनेक अनुयायी कार्यकर्ते तयार केले. वैदिक धर्माच्या प्रसारासाठी हिंदूंच्या मरगळलेल्या मनाला चालना देऊन सर्वस्वाचा त्याग करुन अपार कष्ट भोगण्यास सिद्ध असणारे बुद्धिमान, विचारवंत व प्रभावी वक्ते भारतभर निर्माण केले. पुढे त्यांच्या या अनुयायान गुरुकुल या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या शाळामधून सर्व दृष्टिकोनातून आदर्श अशी तरुण पिढी तयार झाली. आर्य समाजाच्या प्रसारासाठी गुरुकुलातून विद्या संपादन करुन बाहेर पडलेले वक्ते हजारो लोकांना आपल्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध करू लागले. त्यामुळे वैदिक धर्माचा हिंदुस्थानभर झपाटयाने प्रसार होऊ लागला.

संदर्भ सूची

  1. स्वामी रामानंद तीर्थ: हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी, मुंबई, पॉप्युलर प्रकाशन,
  2. दाते सुनील: हैदराबाद संस्थानातील राजकीय प्रभाव, मराठवाडा सुवर्णमहोत्
  3. भालेराव अनंत: हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा, औ.बाद, स्वा.रा.ती. सं. संस्था,
  4. मुळे वसंत: निजाम काळातील मराठवाडा मुक्तिसंग्राम, संपा. देशमुख लक्ष्मीकांत/धारुरकर, औ.बाद., मराठवाडा साहित्य परिषद,
  5. प्रधान ग. प्र.: स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत, पुणे, साधना प्रकाशन,

Files

202301041927010_c.pdf

Files (240.4 kB)

Name Size
md5:f550d7b557d5ce1aa121631664fc4242
240.4 kB Preview Download