Published September 12, 2023 | Version v1

स्वातंत्र्य सेनानी माणिकचंदजी पहाडे

  • 1. सेवा-निवृत प्राध्यापक

Description

स्वातंत्र्य सेनानी माणिकचंदजी पहाडे

प्रा. अ. मा. पहाडे

फ्लॅट नं. ५, बी-बिल्डिंग, मुथियान रेसिडेन्सी, दीप नगर, औरंगाबाद - ४३१००१ महाराष्ट्र, भारत

Received: 05 September, 2023 | Accepted: 09 September, 2023 | Published: 12 September, 2023

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भारत दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण गुलामगिरीत असलेला मराठवाडा मात्र साधारण एक वर्षे एक महिन्यानंतर स्वतंत्र झाला. मराठवाडा म्हणून परिचित असलेला हा सात जिल्ह्यांचा भू-भाग ब्रिटिशांच्या मांडलिक असलेल्या हैदराबाद संस्थानात होता. हैदराबाद संस्थानाचा नवाब निजाम उस्मान अली हा महत्त्वाकांक्षी होता. त्याला भारतात सामील न होता स्वतंत्रच रहावयाचे होते. त्याची महत्त्वकांक्षा पूर्ण झाली असती तर भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकडे झाले असते व अखंड भारताच्या मध्यभागी एक स्वतंत्र राष्ट्र जन्माला आले असते. सुदैवाने गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली 'पोलीस ॲक्शन' नावाची लष्करी कार्यवाही झाली आणि मराठवाड्यासह हैदराबाद संस्थान निजामाच्या जोखडातून मुक्त झाले.

निजामाचे स्वयंसेवक रजाकार जुलमी होते. निजामाने त्यांना तेथील जनतेवर अत्याचार करण्यासाठी पूर्ण मोकळीक दिलेली होती. जनता निमुटपणे जुलूम सहन करत होती. जनतेची गुलामगिरी मनोवृत्ती बनलेली होती. ही मनोवृत्ती आणि भीती घालविण्याचे काम अनेक देशभक्तांनी केले. तथापि त्यातही सन १९२८ ते १९४८ या २० वर्षाच्या कालखंडात म्हणजे प्रथम पासून शेवटपर्यंत अखंडितपणे जनसामान्यात स्वातंत्र्याचे बिजारोपण करणाऱ्या माणिकचंदजींचे नाव अग्रेसर आहे.

"अरे मुंगी मारू नको, तिलाही जीव असतो" अशी बालपणापासून शिकवण देणाऱ्या जैन कुटुंबात इ. स. १८९८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे माणिकचंदजींचा जन्म झाला. कुस्ती हा त्यांचा आवडता खेळ. औरंगाबादला आले, उर्दू शिकले व वकिलीच्या परीक्षा देऊन हायकोर्ट वकील बनले.

जगात सजीव आणि निर्जीव या दोनच जाती आहेत. या तत्त्वावर पूर्ण श्रद्धा असल्यामुळे माणिकचंदजींनी धर्म किंवा जात पाहून मैत्री अथवा शत्रुत्व केले नाही. सन १९२७-१९२८ मध्ये त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात झाली. त्याचा प्रारंभ त्यांनी चर्मकारांच्या वस्तीपासून केला. ते तेथे सायंकाळी जात. चर्मकार बंधू भगिनींना अक्षर ओळख करून देण्यासाठी वर्ग चालवत. जणू देवी सरस्वतीलाच त्यांनी चर्मकरांच्या वस्तीत आणले. संत रोहिदास जयंतीचे कार्यक्रम बसविण्यास ते मार्गदर्शन करीत. चर्मकारातील संकोच जावा म्हणून त्यांना ते जवळ बसून घेत. तो 1930 चा काळ होता. माणिकचंद ज्यांचे हे वागणे समाजातील प्रतिगामी विचारांच्या लोकांना पसंत नव्हते. पण माणिकचंदजींनी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.

दिनांक २३ मार्च १९३१ रोजी माणिकचंदजींनी शहीद भगतसिंग यांच्या फाशीचा निषेध करणारा मोर्चा काढला. औरंगाबादच्या छावणी भागातील कापड गिरणीत राबणाऱ्या कामगारांची स्थिती दयनीय होती. निजामाच्या भीतीमुळे कामगार संघटनेचे नेतृत्व करण्यास कोणी धजावत नसे. कायद्याचे ज्ञान व धाडस यामुळे कामगार संघटनेचे नेतृत्व माणिकचंदजीकडे आले. त्यांनी १९३७ ते १९४८ या काळात मोर्चे, वाटाघाटी या मार्गाने कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले. रोज वाड्या-वस्त्यांत जाऊन समाजात एकीची भावना व स्वातंत्र्याची प्रेरणा देण्यासाठी त्यांचे समाज प्रबोधनाचे काम चालूच होते. कायद्याचे ज्ञान, राजबिंडे व्यक्तिमत्व, फरडे वक्तृत्व यामुळे त्यांची भाषणे अत्यंत प्रभावी असत व याचीच निजामाला भीती वाटत होती. माणिकचंदजींसारखे प्रभावी नेतृत्व काँग्रेस पक्षाचा पाया रोगण्यासाठी गरजेचे आहे, याची विनोबा भावे यांना जाणीव झाली त्यांनी वर्ध्याहून दामोदरदास मुंदडा यांच्यामार्फत माणिकचंदजींकडे संदेश पाठविला. अहिंसेचे जीवनमूल्य असणाऱ्या माणिकचंदजींनी सन १९३६ मध्ये रीतसर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९३७ च्या सत्याग्रहासाठी २७ महिने तर १९४२ च्या भारत छोडो आंदोलनासाठी एक वर्षाची शिक्षा झाली. हैदराबाद स्टेट कार्यकारिणीची ते सदस्य झाले. सन १९५२ मध्ये आमदार म्हणून निवडून आले. ते औरंगाबादचे पहिले आमदार झाले. संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा तसेच मराठी भाषेचा वापर वाढून ते महाराष्ट्राची राजभाषा व्हावी हे त्यांची इच्छा होती. माझ्या मराठवाड्याच्या जनतेची शिक्षणाशिवाय प्रगती होणार नाही हे ओळखून ऑगस्ट १९५३ मध्ये त्यांनी मराठवाड्यात विद्यापीठ स्थापनेची गरज असल्याचे प्रतिपादन केले व या कार्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पाठिंबाही मिळविला.

माणिकचंदजी जोखमीच्या प्रत्येक कामात आघाडीवर राहत असल्याने शंकर भाई पटेल व माणिकचंदजींचे चाहते यांनी माणिकचंदजींना "टायगर पहाडे" असे टोपण नाव दिले होते. माणिकचंदजींच्या धाडस व देशभक्तीच्या अनेक प्रसंगांपैकी एक प्रसंग असा की 'स्वतंत्र झालेल्या भारतीय संघ राज्यात निजामाने सामील व्हावे यासाठी निजामाला सार्वजनिक रित्या तसे आवाहन करण्याचे हैदराबाद स्टेट काँग्रेसने ठरविले होते. जाहीर आवाहनाचे ७ ऑगस्ट १९४८ ही तारीख निश्चित झाली होती. औरंगाबाद या महत्त्वाच्या शहरात याची जबाबदारी मोठ्या नेत्याने घ्यावी असे ठरले. दीड तप आघाडीवर राहून, छातीवर लाठ्या झेलणाऱ्या माणिकचंदजींनी ही जबाबदारी स्वीकारली. माणिकचंदजींवर पाळत ठेवणाऱ्या गुप्तहेरांनी ताबडतोब माणिकचंदजींच्या या नेतृत्वाची ही खबर निजामाकडे पोहोचवली. माणिकचंदजी परगावी आहेत, हे संधी साधून निजामाने माणिकचंदजींसाठी औरंगाबादेत "प्रवेश बंदी" जाहीर केली. शहराच्या सर्व सीमा सील केल्या. निजामाची चाल माणिकचंदजी ओळखून होते. म्हणून ते जिल्हा बंदीपूर्वीच औरंगाबादच्या ग्रामीण भाग असलेल्या चिकलठाण्यात चंदुलालजी पाटणी यांच्या शेतातील गोठ्यात गवताच्या गंजीआड दोन-तीन दिवस लपून राहिले. निजामाला माणिकचंद ज्यांचे इतकी धास्ती होती की ७ तारखेला तेव्हा ५०००० लोकवस्तीच्या औरंगाबाद मध्ये ३०० पोलीस व मदतीला तितकेच रजाकार तैनात करण्यात आले. निजाम एवढ्यावरच थांबला नाही तर माणिकचंदजींना "जिंदा या मुर्दा पकडो" (अहकामात) चा आदेश / फतवा जारी केला.

माणिकचंदजी जिल्हा बंदी असतानाही सरकारी यंत्रणेला चकमा देऊन वेळेवर आले होते. तसेच ते यंदाही येतील याची नागरिकांना खात्री होती. म्हणून गुलमंडी या मध्यवर्ती चौकात दुपारी तीन वाजेपासूनच चार ते पाच हजार नागरिक आपल्या नेत्याची वाट पाहत होते. तर तेथे बंदोबस्तासाठी असणारे १५ ते २० पोलीस, तितकेच रजाकार व दोन-तीन घोडेस्वार जर माणिकचंदजी आलेच तर १९३७ च्या सत्याग्रहाच्या वेळेच्या अपमानाचा पूर्ण बदला घेण्याच्या तयारीत होते.

ठरल्याप्रमाणे शंकर भाई पटेल माणिकचंदजींना घेण्यासाठी चिकलठाण्यास गेले. कोणीही ओळखू नये म्हणून माणिकचंदजींनी तोंडावर मुंडावळ्या असलेल्या नवरदेवासारखा वेश केलेला होता. शंकर भाईंवर फार मोठे दडपण होते. स्मशान मार्गे गल्लीबोळातून त्यांनी माणिकचंदजींना तुकारामपंत देव वकिलांच्या घरी पोहोचवले. लगेच ते तिसऱ्या मजल्यावर गेले. थोडी विश्रांती घेतली, नेहमीचे कपडे घातले, तेथे त्यांचे कार्यकर्ते होतेच. कुठूनतरी पोलिसांना खबर लागली की, माणिकचंद जी गुलमंडी पासून २०० पावलांवर असणाऱ्या देव वकिलांच्या घरात आहेत. सर्वजण तिकडे पळत सुटले, पोलीस येत आहेत, हे तिसऱ्या मजल्यावरून दिसल्याबरोबरच माणिकचंदजी घराच्या खाली आले. घरामागील दीड फूट रुंदीच्या मेहतर गल्ली (पूर्वीच्या काळी मैला वाहून नेण्यासाठी मेहतर लोकांकरिता अरुंद बोळ असे) जवळ आले. कार्यकर्त्यांनी मैल्याची भांडी बाजूला सरकवली, झपझप पावले टाकीत माणिकचंदजी गुलमंडी चौकाकडे निघाले. इकडे पोलिसांनी देव वकिलांच्या घराला वेडा घातला. तोपर्यंत माणिकचंदजी गुलमंडी चौकातील ओट्यावर पोहोचलेले होते. त्यांनी तोंडावरची शाल काढली, आपल्या नेत्याला पाहिल्यावर नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. माणिकचंदजींनी जाकिटातील तिरंगा बाहेर काढला व जोरात स्टेट काँग्रेस जिंदाबाद भारत माता की जय ची घोषणा दिली. लोकांनीही जोरात प्रतिसाद दिला. तदनंतर निजामासाठीचे निवेदन माणिकचंदजी खड्या आवाजात वाचू लागले, घोषणांचा आवाज एकूण सर्व शिपाई गुलमंडीकडे परत आले. जाहीरनाम्याचे वाचन करण्यात गर्क असलेल्या बेसावद माणिकचंदजींच्या कमरेत फरीद नावाच्या जमादाराने जोरात लाथ मारली. माणिकचंदजी तोंडावर पडले, डोक्याला खोच पडली, रक्त येऊ लागले, मग सर्व रझाकार व पोलीस माणिकचंदजींवर तुटून पडले. नालदार बूट व लाट्यांचा वर्षाव सुरू झाला. पण माणिकचंदजींचा भारत माता की जय हा घोष थांबत नव्हता. म्हणून एकाने तोंडावर लाठी मारली, दात पाडले या मारामुळे रक्तबंबाळ झालेले माणिकचंदजी बेशुद्ध झाले. त्यांना ओढत चौकाच्या मध्यभागी आणले, लोक "मारो मत" असे ओरडू लागले. काही रडू लागले, लोकांना पांगविण्यासाठी घोडेस्वार फिरू लागले. घोड्याच्या टापाखाली माणिकचंदजी यावे असे त्यांचे प्रयत्न होते. अर्ध मेल्या माणिकचंदजींना चार पोलिसांनी हातपाय पकडून व्हॅनमध्ये फेकले व हरसुल जेलमध्ये घेऊन गेले.

आपला जीव वाचू शकतो याची हायकोर्टात वकील असलेल्या माणिकचंदजींना पूर्ण जाणीव होती. कुस्तीगीर माणिकचंदजी दोन-तीन पोलिसांना आसमान दाखवू शकले असते. मनमाडच्या दारूगोळा भंडाराचे प्रमुख असलेले माणिकचंदजी हात गोळे (हँड ग्रेनेड) व पिस्तुलाने ८-१० लोकांना जायबंदी करू शकले असते. सर्व नागरिक माणिकचंदजींवर प्रेम करणारे होते. गर्दीचा फायदा घेऊन माणिकचंदजी पळून जाऊ शकत होते, पण असे काहीच न करता शुद्ध हरपेपर्यंत निमुटपणे चोप खाणारे व भारत माता की जय बोलणारे माणिकचंदजी हे धाडस व देशभक्ती याचे भारतीय इतिहासातील अहिंसक लढ्याचे उत्तम उदाहरण आहे.

 

Files

202301041518009_c.pdf

Files (178.5 kB)

Name Size
md5:321b02f90937bf0ccc412bc0036da015
178.5 kB Preview Download