माधव सरकुंडे यांच्या 'सर्वा' या कथासंग्रहाचे वेगळेपण व भाषिक वैशिष्ट्ये
Description
माधव सरकुंडे यांचा सर्वा (कथासंग्रह) २००० मध्ये देवयानी प्रकाशन, यवतमाळ द्वारा प्रकाशित करण्यात आला. माधव सरकुंडे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत या कथा लिहिल्या आहेत. आदिवासीच्या जीवनातील दुःख, कष्ट, ग्रामीण आदिवासी राजकारण, दारिद्रय, व्यथा, निरक्षरता, शोषण, अंधश्रद्धा, सामाजिक प्रश्न, सामाजिक बांधिलकी, ग्रामीण आदिवासी माणसाची संवेदनशीलता, यासारखे विषय त्यांनी जीवंतपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या कथासंग्रहामध्ये एकुण दहा कथा आहेत. वर्हाड मातीत जन्मलेले कथाकार माधव सरकुंडे यांचे वर्हाडी मातीशी, भाषेशी माय लेकराचे नाते आहे. ते वर्हाडात लहानाचे मोठे झाले. मातृभाषा म्हणूनही त्यांची भाषा वर्हाडी त्यामुळे कथा लिहिताना वर्हाडी बोली भाषेमध्ये कुठेही कृत्रिमता आढळत नाही. तर अस्सल वर्हाडी बोलीभाषेचा बाज वाचकांना वाचावयास मिळतो.
'सर्वा' या कथासंग्रहातील वर्हाडी बोलीभाषेचा वापर हे कथाकार माधव सरकुंडे यांच्या कथेचे महत्त्वाचे वैशिष्टये सांगता येईल. माधव सरकुंडे यांच्या 'सर्वा' या कथासंग्रहामधील बोलीभाषा ही यवतमाळ जिल्ह्याच्या आजुबाजूच्या परिसरातील बोलीभाषा आहे. वर्हाडी बोलीभाषेमुळे कथा वाचनीय ठरतात. माधव सरकुंडे यांच्या 'सर्वा' या कथासंग्रहामध्ये म्हणी, वाक् प्रचार, वर्हाडी शब्द, प्रतीके, प्रतिमा, रूपके, उपमा, वर्हाडी संवाद, प्रभावी निवेदनशैली आदीचा समर्थपणे वापर माधव सरकुंडे यांनी केला आहे. माधव सरकुंडे यांच्या 'सर्वा' या कथासंग्रहामध्ये खालील दोन पध्दतीचा अवलंब केलेला दिसतो, (अ). प्रथमपुरूषी निवेदन (ब). तृतीय पुरूषी निवेदन.